आरटीओ : आॅनलाईन अपॉर्इंटमेंटला पाठनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), शहर सोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही (पूर्व) परमनंट लायसन्ससाठी (पक्का वाहन परवाना) सोमवारपासून ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ची सक्ती करण्यात आली आहे. मात्र आज एकाही उमेदवाराने ‘अपॉर्इंटमेंट’ घेतली नसल्याने दिवसभर या विभागाचे काम ठप्प होते. आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १ सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७ सप्टेंबरपासून शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे उमेदवाराला आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडणे शक्य झाले आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता १ डिसेंबरपासून पक्क्या वाहन परवान्यासाठी आॅनलाईन भेटीची वेळ देण्याची पद्धत लागू करण्यात आली. परंतु याची जनजागृती झाली नसल्याने आज जे उमेदवार आरटीओमध्ये उपस्थित होते ते विना अपॉर्इंट आले होते. या सर्वांना खाली हात परतावे लागले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जे उमेदवार खाली हात परतले यातील अनेकांनी मंगळवारसाठी अपॉर्इंटमेंट घेतले आहे. सायंकाळपर्यंत आरटीओ, शहरमध्ये पाच जणांनी तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३० उमेदवारांनी अपॉर्इंटमेंट घेतले आहे. उमेदवारांची आर्थिक पिळवणूक लर्निंग व परमनंट लायसन्ससाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांना संगणकाचे ज्ञान नाही, अशा उमेदवारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शहरातील अनेक नेट कॅफेमध्ये वाहन परवान्यासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंट घेण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांचे शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
परमनंट लायसन्सचे काम ठप्प!
By admin | Updated: December 2, 2014 00:39 IST