नागपूर : भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमुळे परिसरातील नागरिकांना नरकयातना सोसाव्या लागत आहे. अनेक वर्षांपासून यासंबंधी निवेदने देऊनही प्रशासन यावर योग्य कारवाई करीत नसल्याने ‘संघर्ष जगण्याचा’ या संघटनेच्या बॅनरखाली मंगळवारी हजारो नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला.संघटनेच्या अध्यक्षा अध्यक्षा अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात सुरुवातीला बिडगाव ते वाठोडापर्यंत रॅली काढण्यात आली. सई शेंद्रे या सहा वर्षांच्या चिमुकलीने मोर्चाला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. त्यानंतर यशवंत स्टेडियम येथून भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात बिडगाव, भांडेवाडी, यशोदानगर, वाठोडा लेआऊट, साईबाबानगर, गणेश लेआऊट, अंतुजीनगर, पवनशक्तीनगर, श्रावणनगर, वैष्णवदेवीनगर, सूरजनगर, साहिलनगर, शैलेशनगर, राजनगर, चांदमारी आदी परिसरातील सुमारे दोन हजार नागरिकांनी मोर्चात भाग घेतला. याशिवाय नागेश्वरनगर, तरोडी (बु.) तरोडी (खु.) खेडी, परसोडी, आडका, टेमसना आदी गावातील हजारो नागरिक मनपा प्रशासनाविरुद्ध एकत्र आले. मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटजवळ मोर्चा थांबविण्यात आला. यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापौर प्रवीण दटके यांना निवेदन सोपविले. शिष्टमंडळात लेकुरवाळे यांच्यासह सतीश बरडे, गणेश महल्ले, रमेश कातुरे, परमेश्वर चिकटे, वीरू जामगडे, लक्ष्मी चौधरी, आरती चौधरी, जयश्री पासवान, रूपाली कातुरे, ओंकार कटरे, नीता पारसकर, प्रवीण हटवार, निर्मला पारधी, कैलाश टाले, आरती बोचर, ज्योती शाहू, मीना वाळके, शिवानंद सहारे, सुभाष कोसरे, सत्यवती कडू आदींचा सहभाग होता. विविध गावातील प्रतिनिधींमध्ये बबन खुळे, असुराजी कडू, विठ्ठल महल्ले, आशिष महाल्ले, डोमाजी कातुरे, अमोल खोडके, छत्रपाल करडभाजणे, सुरेंद्र खत्री, सुरेंद्र हरिणखेडे, विलास भोयर, काशीनाथ बोंडे, रमेश लेकुरवाळे, चिखलकर, हटवार आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)
भांडेवाडी डम्पिंग यार्डविरोधात जनतेचा एल्गार
By admin | Updated: November 16, 2016 03:01 IST