लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याचा मायनर रामटेक तालुक्यातील काचूरवाही, मसला गावालगत गेला आहे. काही नागरिकांनी या मायनरलगत अतिक्रमण केले असून, काहींनी त्यात पाईपद्वारे घरांमधील सांडपाणी साेडले आहे. त्या पाण्याची दुर्गंधी येत आहे. या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
काही नागरिकांनी मायनरच्या परिसरात अतिक्रमण करून तिथे टिनांचे शेड तयार करू गाेठे तयार केले आहेत, तर काहींनी लाकडांचा ढीग ठेवला आहे. काहीजण त्या जागेचा वापर गुरे बांधण्यासाठी करतात; तर काहींनी तिथे माेठ्या प्रमाणात उकिरडे तयार केले आहेत. यावर कळस म्हणजे, काहींनी त्यांच्या घरांमधील सांडपाणी पाईपद्वारे चक्क या मायनरमध्ये साेडले आहे. याच परिसरात व मायनरमध्ये काटेरी झुडपेही वाढली आहेत.
या मायनरद्वारे परिसरातील शेतांमध्ये सिंचनासाठी पाणी पुरविले जाते. देखभाल, दुरुस्ती व साफसफाईअभावी हा मायनर बुजल्यागत झाला आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी या मायनरद्वारे शेतापर्यंत पाेहाेचण्याची शक्यता मावळली आहे. धानाच्या पिकाने दगा दिल्याने या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची पेरणी केली आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कालव्याच्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही. मायनर बुजल्यागत झाल्याने शेतापर्यंत पाणी पाेहाेचणार नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे.
पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अधूनमधून कालवा व मायनरची पाहणी करीत असल्याने त्यांना या अतिक्रमणाबाबत माहिती आहे. परंतु, ते हटविण्याबाबत व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कुणीही पुढाकार घेत नाही. शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे तसेच नागरिकांना हाेणारा दुर्गंधीचा त्रास संपविण्यासाठी या मायनरच्या परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवावे; तसेच मायनरची साफसफाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.