काेंढाळी : स्थानिक पाेलीस ठाण्यात शनिवारी (दि. २७) शांतता समितीची बैठक आयाेजित केली हाेती. यात शब्बे बारात, हाेळी यासह अन्य सण व उत्सवाच्या काळातील शांतता आणि काेराेना संक्रमण यावर चर्चा करण्यात आली.
मार्चमध्ये हाेळी, धुलिवंदन, शब्बे बारात, एप्रिलमध्ये गुड फ्रायडे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी यासह अन्य सण व उत्सव आहेत. काेराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, नागरिकांनी हे सण व उत्सव शक्यताे आपापल्या घरी व शांततेत साजरे करावे. घराबाहेर पडण्यापूर्वी मास्कचा नियमित वापर करावा, गर्दी करणे टाळावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासह अन्य सूचना सहायक पाेलीस निरीक्षक प्रभू ठाकरे यांनी केल्या. या सण व उत्सवाच्या काळात काेराेना संक्रमण वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शाहीद मौलाना, याकूब पठाण, रियाज शेख, नूर मोहम्मद, अफसर हुसेन यांनीही काही सूचना केल्या. प्रभू ठाकरे यांनी प्रत्येक शंकेचे समर्पक निरसन केले. बैठकीला पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील पाेलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे सदस्य, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित हाेते. बैठकीचे संचालन व आभारप्रदर्शन सुभाष साळवे यांनी केले.