नागपूर : तोंडावाटे इतरही आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मौखिक आरोग्याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. जोपर्यंत असह्य दाढदुखी, दात हलणे, कीड लागणे किंवा दातांच्या अन्य तक्रारी सुरू होत नाहीत तोपर्यंत मौखिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी खंत प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. प्रतिमा व डॉ. रामकृष्ण शेनॉय यांनी व्यक्त केली.
चेन्नई येथे झालेल्या ‘वर्ल्ड इंडोडॉन्टीक्स काँग्रेस’मध्ये डॉ. प्रतिमा शेनॉय सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या परिषदेत शोधपत्रिका सादर केली. सोबतच ‘रूट कॅनल’ या विषयाचे निरीक्षण केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच त्यांच्या धंतोली येथील ‘शेनॉय डेंटल केअर सेंटर’ला २५ वर्षे पूर्ण झाले, या निमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डॉ. शेनॉय म्हणाले, मौखिक आरोग्यामध्ये दात, हिरड्या व तोंड या तिन्ही अवयवांचा समावेश होतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने दंत चिकित्सकांकडून त्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
-दाताच्या आजाराबाबत विशेष जागृती नाही
डॉ. प्रतिमा शेनॉय म्हणाल्या, भारतात अद्यापही दाताच्या आजाराबाबत विशेष जागृती नाही. दात दुखल्यावरच किंवा इतर समस्या निर्माण झाल्यावरच रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. परिणामी, आजार वाढतोच सोबतच उपचाराचा खर्चही वाढतो.
-मुलांमध्ये दात किडण्याचे वाढले प्रमाण
पूर्वी जेव्हा लहान मुले हट्ट करायची तेव्हाच त्यांना चॉकलेट, बिस्किटे दिले जायचे. परंतु आता घरातील मोठी मंडळीच त्यांना हे पदार्थ आणून देतात. परिणामी, गोड पदार्थ दातांवर साचून राहून दात किडण्याच्या समस्येत वाढ झाली आहे.
-हिरड्यांची नियमित तपासणी गरजेची
मौखिक आरोग्य चांगले नसल्यास दाताचे, हिरड्यांचे विकार वाढतात. दात स्वच्छ न ठेवल्यास त्या ठिकाणी आम्ल तयार होते व दात किडतात. काहीवेळा त्यामुळे दाताला छिद्रे पडतात. ही छिद्रे भरली नाहीत तर दात दुखायला लागतो. तेथील रक्तवाहिन्या तुटतात. हिरड्यातून रक्त व पू येतो. यामुळे दंत चिकित्सकांकडून नियमित हिरड्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.
-अक्कलदाढ काढून टाकणे हाच पर्याय
डॉ. रामकृष्ण शेनॉय म्हणाले, मानवी जबड्याचा आकार कमी होऊ लागला आहे. यामुळे 'विस्डम टीथ' म्हणजे अक्कलदाढांना सामावून घेण्यासाठी तोंडामध्ये पुरेशी जागा नसल्याने जन्मानंतर अनेक वर्षे त्या वर येत नाहीत. त्याची जाणीवही होत नाही. परंतु जेव्हा त्या वर येण्यास सुरुवात होते, तेव्हा मात्र वेदना होतात. अर्धवट वर आलेल्या अक्कलदाढांमध्ये अन्नाचे कण किंवा इतर पदार्थ अडकून राहिल्याने त्या भागात सूज येते. योग्य पद्धतीने अक्कलदाढा काढून टाकणे हाच सर्वांत प्रभावी उपाय आहे.
-तंबाखूसेवनाचा मौखिक आरोग्यावर थेट परिणाम
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ तोंडातील पेशींचे नुकसान करून त्याचा मौखिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. तंबाखूसेवनामुळे तोंड उघडण्यास त्रास होतो. वैद्यकीय भाषेत या समस्येला 'ओरल सबम्युकस फायब्रोसिस' असे म्हणतात. तोंडाच्या कॅन्सरचा हा एक प्रकार आहे. मुख शल्यचिकित्सकाकडून जबड्याचे ट्युमर किंवा अपघातामुळे होणारे फ्रॅक्चरवर उपचार केले जातात.
-वेडेवाकड्या दातांसाठी आता इनव्हीसीबल लाईन ब्रेसेस
दात समोर आले असेल, वेडेवाकडे असतील तर दाताला ‘ब्रेसेस’ म्हणजे ‘क्लीप’ लावल्याने अनेक फायदे मिळतात. यामुळे अन्न चावण्याचा क्षमतेमध्ये सुद्धा सुधारणा होते. बोलताना येणारी समस्या दूर होते. आतातर ‘इनव्हीसीबल लाईन ब्रेसेस’ आल्या आहेत. यामुळे आता मोठेही याचा वापर करू लागले आहेत.