लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किमान वेतन अधिनयमानुसार महापालिकेतील १६४ ऐवजदार कामगारांना १५ महिन्यांचे थकीत किमान वेतनाची १ कोटी ७९ लाखांची थकबाकी ३० दिवसात देण्याचे आदेश सहायक कामगार आयुक्त उ.सू.लोया यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
राज्य सरकारने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी आदेश काढून राज्यातील सर्व महापालिका व नगर परिषदांना किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत स्वतंत्र आस्थापना जाहीर केले आहे. तसेच कामगारांसाठी समान किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार कुशल,अर्धकुशल व अकुशल कामगारांना अनुक्रमे १४०००हजार, १३००० हजार व ११५०० किमान वेतन व महागाई भत्ता २०६५ रुपये जाहीर केला होता. मात्र महापालिका प्रशासनाने कामगारांना किमान वेतन १४ जून २०१६ पासून लागू केले. म्हणजेच १५ महिने उशिरा लागू करण्यात आले.
मनपा प्रशासनाने १५ महिन्यांचे किमान वेतन दिले नव्हते. यासंदर्भात संघटनेच्यावतीने मनपा प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली. आंदोलनही करण्यात आले. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर या संदर्भात महापालिका ऐवजदार संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी ऐवजदार कामगारांच्या वतीने सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली होती. यावर सहायक कामगार आयुक्त उ.सू.लोया यांनी मनपा आयुक्तांना ऐवजदारांना किमान वेतन देण्याचे आदेश दिले.