दुचाकीस्वाराच्या करंगळीला लागले पाच टाके नागपूर : मकरसंक्रांतीचा दुसरा दिवस रविवार सुटीचा आल्याने शहरातील विविध भागात पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बंदी असतानाही जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी अनेकांनी नायलॉनच्या मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात अनेक जण जखमी झाले. रविवारी मेयो, मेडिकलमध्ये २० वर रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. एका दुचाकीस्वाराची मांजामुळे करंगळी चिरली. नॉयलॉन मांजावर बंदी असलीतरी दुसऱ्या दिवशीही याची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे रात्री उशिरापर्यंत माजांमुळे जखमी रुग्णांची संख्या वाढत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत महाकाळकर (५०) रा. बेलदारनगर, नरसाळा, दिघोरी हे किराणा दुकान उघडण्यासाठी अॅक्टीव्हा मोपेडने घरून सक्करदरा मिरची बाजाराकडे जात होते. त्याचवेळी एका दूध विक्रेत्याच्या गाडीला मांजा गुंडाळला आणि तो खाली पडला. त्याच्या मागाहून येणारे महाकाळकर यांच्या हेल्मेटमध्ये मांजा फसला. महाकाळकर हे मान वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच मांजाने त्यांची करंगळी चिरली. अचानक झालेल्या या अपघातामुळे पाच ते सात वाहने एकमेकांवर आदळली. प्रत्यक्षदर्शी एका दुकानदाराने या घटनेची माहिती नायलॉन मांजाविरोधात जनजागृती करणारे किंग कोबरा आॅर्गनायझेशन यूथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांना दिली. रतुडी यांनी संघटनेचे कार्यकर्ता डॉ. अविनाश गोनेवार व डॉ. किरण पांडे यांच्यासोबत घटनास्थळी पोहचून महाकाळकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले नंतर सक्करदरा चौकातील इस्पितळात दाखल केले. तिथे महाकाळकर यांच्या करंगळीला पाच टाके लावण्यात आले. या घटनेसह मेयो, मेडिकलमध्ये २० वर किरकोळ जखमी रुग्णांनी उपचार घेतले. शनिवारी गोळीबार चौक निवासी बाबू पवनीकर (२०) पतंग उडवित असताना दोन मजली इमारतीवरून खाली पडला. त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. २ मध्ये भरती करण्यात आले होते. रविवारी त्यांच्या नातेवाईकांनी मेयोमधून एका खासगी इस्पितळात दाखल केले. (प्रतिनिधी) पक्षी अडकले मांज्यात झाडावर गुंतलेल्या पतंगीच्या मांजामुळे दरवर्षी पक्ष्यांवर संक्रांत येते. यावर्षीही शेकडो पक्षी अडकल्याचे हेल्प फॉर अॅनिमल नागपूर व पीपल फॉर अॅनिमल यांचे म्हणणे आहे. परंतु लोकांच्या नजरेत आलेल्या चार पक्ष्यांना जीवनदान देण्यास या संघटनेला यश आले आहे. यात सिरसपेठ येथील एका झाडात नायलॉन मांजात अडकलेल्या घुबडाला पीयूष आकरे यांनी सुखरूप बाहेर काढले. इतवारी परिसरात अमूर फोलकॉन पक्षी असाच मांजामध्ये अडकलेला होता. विश्वजीत उके यांना याची माहिती मिळताच त्यांनी या पक्ष्याची मांजातून सुटका केली. मांजा आडवा आल्यामुळे अचानक कावळा जमिनीवर आपटला. स्वप्निल बोधाने यांनी डॉ. मयूर काटे यांचा सल्ला घेऊन कावळ्यावर प्राथमिक उपचार करून त्याला निरीक्षणात ठेवले. बेसा रोड गीतानगर येथील ५० फूट उंचीच्या हायमास्ट दिव्यावरील मांजात पोपट अडकला. सचिन काकडे व स्वप्निल बोधाने यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मांजातून पोपटाची सुटका केली.
पतंगीच्या हुल्लडबाजीत २० वर जखमी
By admin | Updated: January 16, 2017 01:54 IST