नागपूर : अखंड महाराष्ट्राची भूमिका घेत भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर ‘यु’ टर्न घेतला असला तरी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी मात्र त्यांचा पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.पासवान नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी यावेळी त्यांच्या पक्षाचा भाजपला पाठिंबा जाहीर केला. प्रादेशिक पक्षाला संपवण्याची भूमिका भाजपची नाही, महाराष्ट्रात शिवसेनेशी तुटलेल्या युतीमागे शिवसेनेने केलेल्या अवास्वव जागेची मागणी हे कारण आहे, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ‘इगो’ मुळे युती तुटली, असे पासवान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्तीत जास्त सभा आयोजित करण्याच्या भाजपच्या व्यूहनीतीचेही त्यांनी समर्थन केले पण स्थानिक पातळीवर या पक्षाकडे मत मिळवून देणारा चेहरा नसल्याने मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात. मोदींच्या नावावर मते मिळतात हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले, असेही ते म्हणाले.राजकारणात नीती असणाऱ्या नेत्यांचा दुष्काळ पडू लागला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट अद्यापही कायम आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा मानसन्मान विदेशातही वाढलेला आहे. स्वच्छ भारत, आदर्श ग्राम योजना सुरू करून त्यांनी देश विकासाची पावले उचलली आहेत, या शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले.स्वतंत्र विदर्भाबाबत मोदीसुद्धा सकारात्मकच आहेत. पण ते राष्ट्रीय नेते असल्याने त्यांना अखंड महाराष्ट्राची भूमिका घ्यावी लागली. यासंदर्भात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली चर्चा झाली आहे.लोकजनशक्ती हा छोट्या राज्याचा समर्थक असल्याने आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने आहोत, असे पासवान यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ.मिलिंद माने, श्रीकांत देशपांडे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी आणि लोकजनक्ती पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पासवान स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने
By admin | Updated: October 13, 2014 01:20 IST