लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडच्या कामाला शहराच्या विविध भागात सुरुवात करण्यात आली. चांगले डांबरी रस्ते खोदून या कामाला सुरुवात केली. परंतु गेल्या वर्षभरापासूून सिमेंट रोडची बहुतेक कामे ठप्प आहे तर काही ठिकाणी सुरू असलेली कामे संथ आहे. अर्धवट सिमेंट रोड व विविध कामासाठी रस्ते खोदकाम करण्यात आल्याने आजूबाजूच्या वस्त्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिमेंट रोडच्या कामामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
३०० कोटींच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या तिसऱ्या टप्प्यात १८७ कोटींची ३९ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. परंतु यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. मानेवाडा रोडवरील सिद्धेश्वर सभागृहाच्या बाजूचा सिमेंटरोड मागील वर्षभरापासून अर्धवट आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आजूबाजूच्या नागरिकांना ये-जा करताना फेऱ्याने जावे लागते. लगतच्या भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑरेंज सिटी ते खामलारोड दरम्यानचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता अर्धवट आहे. भीमचौक ते रिंगरोडचे काम पूर्ण झालेले नाही. मोक्षधाम ते इमामवाडा, आयसोलेशन हॉस्पिटल समोरील रोड, व्हीआयपी रोडवरी सेंट्रल मॉल जवळील रोड, राजकमल चौक, सिध्देश्वर सभागृहालगतचा रोड, चिखली ले-आऊट सिमेंट रोडचे काम अर्धवट आहे. डिप्टी सिग्नल ते भरतवाडा सिमेंट रोडचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु चौकातील काम अर्धवट असल्याने अपघाताचा धोका आहे. शहरातील अन्य भागातील सिमेंट रोडची अशीच अवस्था आहे.
....
निधी अभावी काम संथ
तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या कामात राज्य सरकार, नासुप्र व महापालिकेचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. यातील १८७ कोटींची ३९ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. यात राज्य सरकार व नासुप्रने प्रत्येकी ६२.५० कोटी असा १२५ कोटींचा निधी दिला. १०० कोटी मनपाला द्यावयाचे आहे. परंतु आर्थिक स्थितीमुळे मनपाकडूनही निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेची यंत्रणा वर्षभरापासून कोरोना नियंत्रणात व्यस्त आहे. काही कामे मजुराअभावी रखडल्याचे सांगण्यात आले.
.......