नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा धोटे यांचा मुलगा पंकज धोटेला त्याचे सहा साथीदार आणि माऊजरसह अटक केली. काही दिवसांपूर्वी लोकमतने हवालाची रक्कम लुटण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. तेव्हापासून पंकजवर पोलिसांची नजर होती. पंकजसोबत अब्दुल करीम अजीज शेख (३२) रा. नागसेन सोसायटी मानकापूर, पुष्पेंद्र सत्यपाल शर्मा (३१) रोहीत रुपसिंह ठाकूर (२४) भूपेशनगर बोरगाव, शानीजान (३०) रा. रेल्वे क्वॉर्टर माऊंट रोड, राहुल सुशील भालेराव (२१) भूपेशनगर, रोहित मनोहर सिरसाट (२३) रा. पटेलनगर बोरगाव आणि गौरव हरीओम अग्रवाल (२४) रा. गांधी चौक सदर अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. पंकज अनेक दिवसांपासून गिट्टीखदान पोलीस ठाणे परिसरात राहतो. त्याचा वडिलांसोबत काहीही संबंध नाही. गुन्हे शाखा पोलिसांना बुधवारी रात्री पंकज आपल्या साथीदारांसह शस्त्रांनी सज्ज होऊन सिव्हील लाईन्सच्या ग्रामीण तहसील कार्यालयाजवळ लपून असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रात्री २.५० वाजता तीन बाईकवर स्वार आरोपी ग्रामीण तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूला आढळून आले. त्यांच्याजवळ एक माऊजर, चाकू आणि दरोड्यात वापरण्यात येणारे साहित्य सापडले. त्यांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची योजना आखली असल्याचीही माहिती आहे. पंकजला यापूर्वीही माऊजरसह पकडण्यात आले आहे. लोकमतने काही दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांनी प्राप्त केलेल्या हवालाचे ४० लाख रुपये लुटण्यात आल्याचा खुलासा केला होता. कोतवाली पोलिसांनी रुपयांसह दोघांना पकडले होते. या कारवाईनंतर पंकज अचानक सक्रिय झाला होता. तो त्याचा साथीदार असलेला गड्डीगोदाम येथील एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी कोतवाली ठाणे व न्यायालयातही आला होता. हवालाच्या रकमेची टीप देणाऱ्या तरुणाला धमकावण्यासाठी गिट्टीखदानमध्ये गोळीबार करण्याचाही लोकमतने उल्लेख केला होता. तो गोळीबार कुख्यात प्रतापने केला होता. प्रताप पंकजशी जुळलेला आहे. सूत्रानुसार पोलिसांनी हवाला प्रकरणाच्या तपासादरम्यान पंकजच्या संशयास्पद हालचालींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. टीप देणाऱ्याने ९८ लाख रुपये असल्याची माहिती दिली होती. गुन्हेगारांची योजना रहाटे कॉलनी चौक ते दीक्षाभूमी दरम्यान लुटण्याची होती. यापूर्वी कोतवाली पोलिसांनी अग्रसेन चौकाजवळ हवाला कर्मचाऱ्यांना पकडले. पोलिसांनी ४० लाख रुपये मिळाल्याचा खुलासा केला.(प्रतिनिधी)
पंकज धोटेला माऊजरसह अटक
By admin | Updated: May 1, 2015 02:33 IST