नागपूर : पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना सर्वत्र सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेला अलर्ट जारी करण्यात आला असून, रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना अतिसतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामला केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या क्रूरतेचा निषेध केला जात आहे. या घटनेनंतर सिमेवर युद्धसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे 'रेल्वेत घातपात घडवून आणण्याचा संशय' निर्माण झाल्यामुळे सर्वत्र अलर्ट देण्यात आला आहे. अतिसतर्कता बाळगा, सूक्ष्म नजर ठेवा आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करा, असे या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या विविध विभागात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दलाचे शिर्षस्थ आणि रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू झाले असून, सुरक्षेचा प्लॅनही चॉकआउट झाला आहे.या संबंधाने रेल्वेत कार्यरत प्रत्येकाला दक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांवर आणि प्रत्येक ट्रेनमध्येही मोठ्या संख्येत खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय करण्यात आले आहे. फलाटावरच्या सीसीटीव्हीवर नजर रोखण्यात आली असून, प्रत्येक घडामोडी डोळ्यात तेल टाकून टिपण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्थानकाबाहेरही खबरे कामी लावण्यात आले आहे. महत्वाच्या मार्गावर धावण्यात येणाऱ्या 'ट्रेनचे एक्स्कॉर्टींग' सुरू करण्यात आले आहे.
ट्रॅक मॅनसह अनेकांना विशेष खबरदारीचे आदेश -आम्ही आमच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोज ब्रिफिंग करीत असून, प्रत्येक बारिक सारिक घडामोडीचे अपडेट एकमेकांना कळवित असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी 'लोकमत'ला दिली. ट्रॅक मॅनसह सर्व स्टाफला विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून, काही गाड्यांमध्ये अतिरिक्त सशस्त्र जवान तैनात करण्यात आल्याचेही आर्य यांनी आज सांगितले.
रेल्वे प्रवाशांच्या सूरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहोत. स्टेशन किंवा ट्रेनमध्ये तिकिट तपासणीस (टीसी), आरपीएफ, जीआरपीच्या जवानांना सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कुठेही कोणता संशयीत व्यक्ती अथवा सामान आढळल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन किंवा जवळ दिसणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी.- अमन मित्तल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.