नागपूर विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढतेय : विमानांच्या दळणवळणातून ३२ कोटींचा महसूल नागपूर : उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून २०१६ मध्ये वर्षभरात येथून सव्वानऊ लाखांहून अधिक प्रवाशांनी हवाई प्रवास केला. सरासरी प्रत्येक दिवशी हवाईमार्गाने शहराबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे अडीच हजार इतकी होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘मिहान इंडिया लिमिटेड’कडे विचारणा केली होती. २०१६ मध्ये नागपूर विमानतळावरून किती प्रवाशांनी प्रवास केला, या कालावधीत किती खासगी हेलिकॉप्टर्स व विमाने उतरली, विमानांच्या दळणवळणातून किती महसूल प्राप्त झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर विमानतळावरुन ९ लाख ३१ हजार ५२३ प्रवाशांनी प्रवास केला. वर्षभरात नियोजित व आकस्मिक उड्डाणे धरून एकूण ८ हजार १५० विमाने व हेलिकॉप्टर्स विमानतळावर उतरली तर त्याच संख्येत विमाने व हेलिकॉप्टर्स उडाली. विमानतळाहून सरासरी दिवसाला २२ विमानांचे उड्डाण झाले. वर्षभरात विमानांच्या दळणवळणातून ‘मिहान इंडिया लिमिटेड’ला ३२ कोटी ९० लाख ३४ हजार ४२९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. हा महसूल प्रामुख्याने ‘लॅन्डिंग’, ‘पार्किंग’, ‘पीएसएफ’ (पॅसेंजर सर्व्हिस फी) आणि जाहिरातीच्या माध्यमातून मिळाला. विमानांच्या ‘लॅन्डिंग’पासून ११ कोटी ६७ लाख ६७ हजार ४५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर ‘पीएसएफ’अंतर्गत १९ कोटी ३० लाख ४१ हजार ९९० रुपयांचा महसूल मिळाला.
विमानतळावर वर्षभरात सव्वानऊ लाखांहून अधिक प्रवासी
By admin | Updated: March 16, 2017 02:10 IST