प्रभाव लोकमतचा नागपूर : देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मागील ८ वर्षांपासून या सेंटरच्या इमारतीचे काम रखडलेलेच आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकशित करून लक्ष वेधताच विविध संघटना सरसावल्या आहेत. यासंबंधात विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा संघटनांनी दिला आहे. बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या इमारतीचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सर्वाधिक पाली प्राकृत विभाग आग्रही आहे. कारण सध्या स्टडी सेंटरचे वर्ग पाली प्राकृत विभागातच भरविले जात आहे. यासंबंधात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध अनेक संघटनांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शेंडेनगर येथील शाक्यमुनी बुद्ध विहारातील अर्चना मेंढे, रंजना पाटील, शर्मिला चंद्रिकापुरे, वंदना बनकर, सविता डोईफोडे, बोधिमग्गो सेवा संस्थेचे अध्यक्ष भंते बोधी विनित, शंकरराव निकोसे यांनी विद्यापीठाविरुद्ध निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. जयताळा रोड टाकळी सीम बुद्ध विहारातील साधना नारनवरे, रुपा पथाडे, उज्ज्वला मेश्राम, शामकला भगत, रिता नगराळे, शामला आमटे, सम्राट अशोक बुद्ध विहारातील तेजस्विनी सहारे, रेखा बडोले, दीपक कोचे, ज्योती वानखेडे, अखिल भारतीय भिक्खूसंघ बुद्ध विहार कपिल नगर येथील नम्रता लांजेवार, सुहासिनी हिरेखण, माया मुनघाटे, आशा इंगळे, प्रेरणा वानखेडे आणि रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे, बबन बोंदाटे, अमन सोनटक्के यांनी बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. तातडीने काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)
बुद्धिस्ट स्टडी सेंटरसाठी संघटना सरसावल्या
By admin | Updated: February 18, 2015 02:35 IST