नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व सुनील शुक्रे यांनी गुरुवारी उमरेड तालुका खरेदी-विक्री संघावर प्रशासकीय मंडळ नियुक्तीप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच, प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यासाठी ६ जूनपर्यंत वेळ दिला. १९९७ पासून संघाची निवडणूक झालेली नाही. २००२ मध्ये संघ अवसायानात निघाला होता. २०१२ मध्ये तत्कालीन शासनाने संघाला पुनरुज्जीवित करून प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी या प्रशासकीय मंडळाचा कार्यकाळ संपला. यामुळे अतुल वानखेडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करून संघाची निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. वानखेडे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली असताना वर्तमान शासनाने १८ एप्रिल रोजी नवीन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली. हा निर्णय सहकार कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा करून संघाच्या एका सदस्याने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. नवीन प्रशासकीय मंडळाला संस्थेचा कार्यभार घेण्यापासून थांबविण्यात यावे व ३० जूनपूर्वी संघाची निवडणूक घेण्यात यावी अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. याचिका कर्त्यातर्फे अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
प्रशासकीय मंडळ नियुक्तीवर जैसे थे आदेश
By admin | Updated: May 1, 2015 02:31 IST