लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर राजकीय आसूड ओढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीकास्त्र सोडले. विरोधकांनी आता तरी रडगाणे थांबवायला हवे. आता त्यांनी आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे, असे आवाहन त्यांनी केले.
काल सभागृहात पाहुणे कलाकार येऊन गेले. मीडियासमोर रडगाणे गाण्यापेक्षा सभागृहात येऊन बाजू मांडली पाहिजे. 'किसी को विरासत मे गद्दी मिलती है, पर हर किसी को बुद्धी नहीं मिलती.' त्यांच्या डोळ्यात पराभवाचे पाणी आहे, त्यामुळे त्यांना जनतेचा जल्लोष दिसत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी चिमटे काढले.
गेल्या अडीच वर्षांत महायुतीने कल्याणकारी योजनांचे विक्रमी काम केले. एकही सुटी न घेता टीम म्हणून काम केले. त्यामुळे निकालात इतिहास घडला. निवडणुकीत विरोधकांना मतदारांनी अस्मान दाखविले. 'गिरे तो भी टांग उपर' अशीच विरोधकांची अवस्था आहे. विरोधी पक्षांवर जनतेने बहिष्कार टाकला आहे. त्यांना सगळे कळत आहे, पण वळत नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.