नागपूर : मेट्रो रेल्वेसाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसात मेट्रो रेल्वेला मिळणाऱ्या १५०० कोटी रुपयांवर (२०० दशलक्ष युरो)अंतिम निर्णय होणार आहे. फ्रान्सची चमू २६ मार्चला तीन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात येत आहे. चमूत किती सदस्य राहतील, यावर नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने खुलासा केलेला नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रान्सची सरकारी कंपनी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीची (एएफडी) चमू गुरुवार, २६ ला सकाळी ८ वाजता बेंगळुरू येथून नागपुरात येणार आहे. त्यानंतर ही चमू सकाळी १० वाजता मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेणार आहे. हर्डीकर बुधवारी मुंबईला गेले होते. चमूच्या भेटीसाठी मनपाने आधीच तयारी केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, फ्रान्सची चमू आयुक्तांच्या भेटीनंतर सायंकाळपर्यंत मिहानचा दौरा आणि अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. भेटीदरम्यान मेट्रो रेल्वेचे अधिकारी हजर राहणार नाहीत. फ्रान्सच्या चमूने १५०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे. प्रकल्पाचे आर्थिक पैलू आणि पूर्ण होण्याच्या कालावधीसह अन्य पैलूंवर समाधान झाल्यानंतर चमू कर्ज देण्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.
फ्रान्सचे आॅपरेशन मेट्रो
By admin | Updated: March 26, 2015 02:25 IST