नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत या मुद्यावर खुली चर्चा व्हावी, असे मत केंद्रीय नगर विकास खात्याचे मंत्री व भाजपचे नेते वेंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.नायडू शनिवारी महापालिकेच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे आले असता एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. भूमी अधिग्रहण विधेयकावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेकडे त्यांचे लक्ष वेधले असता नायडू म्हणाले, काँग्रेसच्याच राजवटीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या. काँग्रेस राजवटीत इंग्रजकालीन कायद्यानुसार जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यामुळेच २०१३ मध्ये काँग्रेसने त्यात बदल केला. तेव्हा भारतीय जनता पक्षाने सहकार्य केले होते. आता केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर तत्कालीन ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात २८ राज्यांनी यात सुधारणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसारच यात बदल करण्यात आले. यावर संसदेत प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या अनेक सूचना स्वीकारण्यात आल्या. सुधारित विधेयकामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यांना चारपट अधिक जमिनीचा मोबदला मिळणार असून त्यांच्या मुलांना नोकरी व नोकरी न मिळाल्यास २० वर्षांपर्यंत दरमहा मानधन देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध हा केवळ विरोधासाठी आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. संसदेत या विधेयकावर चर्चा झाली आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही. या मुद्यावर देशव्यापी चर्चा व्हावी, असे नायडू म्हणाले.सुधारित विधेयकात अधिक मोबदल्याची तरतूद असल्याने केंद्राच्या विविध योजनांसाठी जमीन अधिग्रहित करताना त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून वटहुकूम काढणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भूमी अधिग्रहणावर खुली चर्चा व्हावी
By admin | Updated: March 29, 2015 02:26 IST