लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या नागपुरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या इतकी जास्त आहे की, शासकीय व खासगी वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोविड रुग्णांना वेळीच वैद्यकीय सल्ला व औषधोपचार मिळावेत तसेच प्रशासनालाही मदत व्हावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पुढाकार घेत दीक्षाभूमी येथे कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क ओपीडी सुरू केली आहे.
दीक्षाभूमी स्मारक समिती व समता आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी परिसरातील यात्री निवासात ही ओपीडी सुरू झाली आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, प्रकल्प प्रमुख डॉ. महेंद्र कांबळे, ॲड. स्मिता कांबळे, विश्वास पाटील, राजेश लांजेवार, ॲड. आकाश मून आणि समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते.
ज्या कुणाला कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील आणि ऑक्सिजन लेव्हल ९२-९७ पर्यंत असेल त्यांनी या ओपीडीचा नि:शुल्क लाभ घ्यावा. ही ओपीडी दररोज दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.