श्रीसूर्या फसवणूक प्रकरण : हायकोर्टात शासनाची माहितीनागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या ६० पैकी केवळ ८ एजंटांनाच आतापर्यंत प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. २८ एजंटना नोटीस तामील झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे. उर्वरित एजंटाना विविध कारणांमुळे अद्याप नोटीस तामील झालेली नाही. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.श्रीसूर्या पीडित ठेवीदार कृती समितीने फौजदारी रिट याचिका दाखल करून श्रीसूर्या फसवणूकप्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत तपास करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने गेल्या तारखेला प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत काय प्रगती झाली याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याने शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढील सुनावणी १३ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे. प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी प्रचंड निष्काळजीपणा दाखवला आहे. त्यांनी श्रीसूर्या समूहाचा अध्यक्ष समीर सुधीर जोशी व संचालिका पल्लवी समीर जोशी यांना एक महिना उशिरा अटक केल्यामुळे वादग्रस्त संपत्ती लपविण्याला व पुरावे नष्ट करण्याला बराच वेळ मिळाला. जोशी दाम्पत्याला पोलिसांची अप्रत्यक्षरीत्या मदतच झाली. परिणामी पीडित ठेवीदारांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अनिल किलोर तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
६० पैकी केवळ ८ एजंटना केले आरोपी
By admin | Updated: July 7, 2015 02:28 IST