वसीम कुरेशी
नागपूर : समन्वयाचा अभाव, कामात उशीर आणि नियोजनाच्या अभावामुळे पारडी फ्लायओव्हरचे काम रखडलेलेच आहे. हे काम २०१६ मध्ये सुरू झाले होते. ३० मार्च २०१९ रोजी ते पूर्ण होणार होते; परंतु हे काम २५ सप्टेबर २०१९ रोजी केवळ ३०.९६ टक्केच पूर्ण होऊ शकले. त्यामुळे हे काम किती कासवगतीने सुरू आहे याचा अंदाज येतो. आता कंत्राटदार कंपनीला २१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली असून नागरिकांना मात्र त्रास होणार आहे.
नागपूरचा चौफेर विकास होत असून नव्या फ्लॅट स्कीमचे उद्घाटन राजकीय नेत्यांच्या हस्ते होत आहे; परंतु रोजगारासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे. पारडी उड्डाणपुलाचे काम कासवगतीने होत असल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामगारांना याच मार्गाने जाऊन दोन वेळच्या भोजनासाठी मेहनत करावी लागत आहे. येथून जाताना नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. पारडी ते कापसीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे; परंतु येथेही मेट्रोचे काम मंदगतीने होत आहे. काम अतिशय संथगतीने होत असतानाही कंत्राटदार कंपनीला सवलत मिळाली आहे. पारडी फ्लायओव्हरच्या कामात कंत्राटदार कंपनीचे जबाबदार अधिकारी विरले साईटवर पाहणी करीत आहेत; परंतु उड्डाणपुलाच्या कामात तत्परता का दाखविण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
............