दोघींची तक्रार : प्रतापनगरात गुन्हे दाखल नागपूर : एकतर्फी प्रेमातून प्रतापनगरात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे एकाच दिवशी दाखल झाले. पहिल्या गुन्ह्यातील पीडित १७ वर्षांची तर, दुसरी २२ वर्षांची आहे. गोपाळनगरातील विक्की चंदन सोनवणे (वय २१) हा १७ वर्षाच्या मुलीवर प्रेम करू लागला. त्यासाठी तो एप्रिल महिन्यापासून तिच्या सारखा मागे लागला. पाठलाग करणे, जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करणे तिने बोलण्यास नकार दिल्यामुळे तिला अश्लील शिवीगाळ करणे, असा त्याचा उपद्रव सारखा सुरू होता.प्रारंभी दुर्लक्ष केल्या नंतर तिने त्याला नाना प्रकारे समजून सांगितले. मात्र, तो मानायला तयार नसल्याने त्रासलेल्या युवतीने शुक्रवारी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विक्की सोनवणेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या प्रकरणातील आरोपीचे नाव विनय तेजनारायण राय आहे. तक्रारकर्त्या २२ वर्षाच्या तरुणीचा जुलै २०१३ पासून तो पाठलाग करीत आहे. तिच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर तो वारंवार फोन करून, अश्लील मेसेज आणि संभाषण करतो. तो ऐकायला तयार नसल्यामुळे अखेर तरुणीने शुक्रवारी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
एकतर्फी प्रेमातून विनयभंग
By admin | Updated: June 30, 2014 00:45 IST