कन्हान : चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्क्म व साेन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना कन्हान शहरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री घडली.
इंदू एकनाथ गाेंडाणे (६०, रा. शंकरनगर, कन्हान, ता. पारशिवनी) या कुटुंबीयांसह शुक्रवारी सकाळी बाहेरगावी गेल्या हाेत्या. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील ७७ हजार रुपये राेख, २० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने व ६,६०० रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच इंदू गाेंडाणे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.