उमरेड : तालुक्यातील ठाणा शिवारात सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अशोक सोमाजी पौनीकर (४४, रा. इतवारी पेठ, उमरेड) असे मृताचे नाव आहे. विशाल शेषराव हत्तीमारे (२५), धीरज मुरलीधर अवचट (१८) आणि राजेश रामधार त्रिपाठी (४८, सर्व रा. उमरेड) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. अशोक पौनीकर हे राजेश त्रिपाठी यांच्यासोबत दुचाकी वाहनाने (एमएच ४० बीएक्स १०७५) उमरेड येथून भिवापूरच्या दिशेने जात होते. अशातच समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक लागली. अपघातात दोन दुचाकींवर बसलेल्या चारही जणांना जबर मार बसला. त्यांना लागलीच नागपूर येथे रवाना करण्यात आले. नागपूर मेडिकल येथे तपासणीअंती दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अशोक पौनीकर यांना मृत घोषित करण्यात आले. अशोक यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर भिवापूर मार्गस्थित स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो : मृत अशोक पौनीकर.