काटाेल : भरधाव अज्ञात वाहनाने माेटरसासकलला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना काटाेल परिसरात शुक्रवारी (दि. १६) रात्री ८.२० वाजताच्या सुमारास घडली.
अजय वसंतराव लाेही (५२, रा. पेठबुधवार, काटाेल) असे मृताचे तर विजय अरसडे, रा. काटाेल असे जखमीचे नाव आहे. दाेघेही मित्र असून, ते एमएच-४०/एफ-०३१६ क्रमांकाच्या माेटरसायकलने काटाेल नाक्याहून काटाेल शहराच्या दिशेने डबलसीट येत हाेते. त्यातच मागून वेगात आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. डाॅक्टरांनी तपासणीअंती अजय लाेही यांना मृत घाेषित केले तर विजय अरसडे यांच्यावर उपचाराला सुरुवात केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकावरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक संताेष आंधळे करीत आहेत.