मेंढला : भरधाव दुचाकी स्लिप हाेऊन मागे बसलेल्या एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली. दरम्यान, उपचारासाठी नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आरंभी-खराळा मार्गावर नुकतीच घडली.
सुखदेव जुबंडकर (६०, रा. आरंभी, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. सुखदेव जुबंडकर हे रवींद्र राऊत यांच्यासाेबत दुचाकीने लग्नासाठी जायला निघाले. रवींद्र हा दुचाकी चालवित हाेता तर सुखदेव जुबंडकर हे मागे बसले हाेते. दरम्यान, भरधाव दुचाकी स्लिप झाल्याने सुखदेव हे रस्त्यावर पडले. त्यात त्यांच्या डाेक्याला गंभीररीत्या दुखापत झाली. याबाबत कळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सुखदेव यांना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका बाेलावली. त्यांना मेंढला येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणत असताना वाढाेणा गावानजीक वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मेंढला आराेग्य केंद्रातील डाॅ. मिथुन घाेलपे यांनी तपासणीअंती सुखदेव जुबंडकर यांना मृत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच जलालखेडा पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक राजेंद्र साेनवणे करीत आहेत.