सावनेर : पाेलिसांनी खापा ते सावनेर राेड येथे केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतुकीचे ट्रॅक्टर पडकले. यात ट्रॅक्टरचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ३ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.५) दुपारी १२.४१ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
बादल संजय पालीवाल (२१, रा. दफई काेथुर्णा) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. सावनेर पाेलीस गस्तीवर असताना त्यांना खापा ते सावनेर राेडवर एमएच-२७/एल-८१०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विना राॅयल्टी एक ब्रास रेती भरून वाहतूक करताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टरचालकास अटक केली. त्याच्याकडून ३ लाख रुपयांचे ट्रॅक्टर आणि तीन हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक फुलेकर करीत आहेत.