लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या चहा टपरीला असामाजिक तत्वांनी आग लावली. ही घटना शनिवारी रात्री जीजामातानगर वाठोडा येथे घडली. रविवारी सकाळी ६ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता घटना उघडकीस आली.
तायडे दाम्पत्य ही चहाची टपरी चालवित होते. या टपरीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु काही असामाजिक तत्वांनी आग लावल्याने यात चहा टपरीतील शेड, लाकडाचा टेबल व इतर साहित्य जळाले. मिळालेेल्या माहितीनुसार तायडे हे कोरोना लागण्यापूर्वी शाळेची बस चालवायचे. परंतु कोविड संकटात स्कुल व्हॅन बंद झाली. त्यामुळे वस्तीतील चौकात खुल्या जागेवर त्यांनी चहा व नाश्त्याचे दुकान सुरू केले. नेहमीप्रमाणे त्यांनी शनिवारी दुपारी २ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दुकान सुरु करण्यासाठी गेले असता घटना उघडकीस आली.
टपरीजवळ नेहमीच असामाजिक तत्वांचा वावर असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जमा असतात. रविवारी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. परंतु यासंदर्भात वाठोडा पोलिसांशी संपर्क साधला असता कुठलीही तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या परिसरात पोलिसांची नियमित गस्त असावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.