नागपूर : वर्षभरापासून सहकारनगर परिसरात असलेल्या अवैध मटन मार्केटच्या विरोधात परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगरला वारंवार निवेदन दिले. मात्र अवैध मार्केट चालविणाऱ्या लोकांसोबत मनपातील काही लोकांचे संबंध असल्याने कारवाईच होत नसल्याचा आरोप करीत मनसे सैनिकांनी झोनचे सहाय्यक आयुक्त सतिश चौधरी यांना कोंबड्या भेट दिल्या.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व मनसेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने चौधरी यांचेशी अवैध मार्केट मुळे होणारा त्रास, वाढलेली दुर्गंधी,भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य, वाढते अपघात, अपघातात एका महिलेचा झालेला मृत्यू, या विषयांवर विस्तृत चर्चा केली. त्याचप्रमाणे हे विक्रेते कोण आहेत ? ते कुठले नागरिक आहेत ? त्याची माहिती मनपा जवळ का नाही ? अश्या विविध प्रश्नांचा भडिमार करून कोंबड्यांची भेट दिली. यापुढेही अवैध मार्केट सुरूच ठेवले तर आज कोंबड्या भेट दिल्या काही दिवसात झोन कार्यालयाच्या परिसरात आम्ही अवैध मार्केट सुरू करू, असा इशारा दिला.