नागपूर : कोरोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीचा परिणाम आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिसायला लागला आहे. येथील वर्दळ जवळपास थांबल्यात जमा आहे. सर्वत्र भयाण शांतता पसरली असून जेवणाच्या वेळेतही कर्मचारी आपल्या जागेवरून हलायला तयार नसल्याचे चित्र आहे. या सर्व कार्यालयांमध्ये या काळात प्रचंड वर्दळ असायची. विद्यापीठात आणि बोर्डात परीक्षेशी संबंधित कामकाजासाठी विद्यार्थी व शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी असायची. शिक्षणाधिकारी कार्यालयातही अशीच गर्दी दिसायची. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यालयीन कामकाजासोबतच अकरावीच्या प्रवेशाची तयारी सुरू झालेली दिसायची. मात्र कोरोना संक्रमण घातक वळणावर जात असल्याचे पाहून परीक्षा रद्द झाल्या. यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अकरावीसाठी सुरू होणारी प्रवेश प्रक्रियेची धावपळही थांबली. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. महाविद्यालयांना परीक्षा संबंधित कामे या कार्यालयात न येता ऑनलाइन करण्याच्या सूचना आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांचे सहकारी संक्रमित झाले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात १२ ते १५ कर्मचारी संक्रमित झाले आहेत. बोर्डातील काही कर्मचाऱ्यांच्या घरचे सदस्य संक्रमित आल्याने हे कर्मचारीही दहशतीमध्ये आहेत. संक्रमण टाळण्यासाठी बाहेरील व्यक्तींना कार्यालयात न येण्याचा सल्ला ते देत आहेत.