पतंगीच्या हुल्लडबाजीत अनेक जखमी दुसऱ्या मजल्यावरून पडला युवक जीवघेणा उन्माद कशासाठी ? नागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पतंगबाजीचा उन्माद शहरात दिसून आला. एक युवक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. दिवसभरात अनेक नागरिक आणि मुले जखमी झाली. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे विविध घटनेतून पुन्हा एकदा सामोर आले आहे. मेयो, मेडिकलमध्ये १४ जणांवर उपचार मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार चौक निवासी बाबू पवनीकर (२०) दोन मजली इमारतीवरून पतंग उडवित असताना अचानक तोल जाऊन खाली पडला. त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. २ मध्ये भरती करण्यात आले. सतीश पाटील हा युवक दुचाकी चालवित असताना चेहऱ्याला मांजा लागून डोळ्याचा खालचा भाग कापला गेला. या घटनेसह इतर १२ जखमी रुग्णांवर मेयोत उपचार करण्यात आले, तर दोन जखमींनी मेडिकलमध्ये उपचार घेतला. आवाहनानंतरही प्रतिसाद नाही दोरा घेऊन मांजा तयार करणे किचकट आहे. यामुळे अनेकजण मराठा, डिस्कव्हरी, मेहबूब खान, बीपीएल, मुन्ना या कंपन्यांचा मांजा वापरतात. मात्र पतंगीच्या कापाकापीत हा मांजा फारसा तग धरत नाही. जिल्हाधिकारी व पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. मात्र त्याला प्रतिसाद दिसून आला नाही. खासगी इस्पितळात ४० रुग्णांवर उपचार शनिवारी खासगी इस्पितळातही उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. रविनगर चौक येथील दंदे हॉस्पिटलमध्ये मांजामुळे हात, गळा व मांडी कापलेल्या आठ रुग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली. मानेवाडा, प्रतापनगर चौक, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कामठी रोड व उमरेड रोड मार्गावरील इस्पितळांतही मांजामुळे जखमी झालेल्या ३० वर रुग्णांवर उपचार झाल्याची माहिती आहे.
बंदीनंतरही ‘नायलॉन’ च!
By admin | Updated: January 15, 2017 02:03 IST