नागपूर : राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी पुन्हा एका बड्या अधिकाऱ्याला पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या. भंडारा-गोंदियाचे भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू व माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना सायबर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यामुळे राजकीय व प्रशासकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, नागपूर शिक्षण बोर्डाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी सध्या तुरुंगात आहे़त. त्यांच्यासह आणखी दोन अधिकारी, मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मेंढे यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील अटक झालेल्या आरोपींची संख्या १९ वर पोहोचली आहे. सतीश मेंढे हे अनेक दिवसांपासून अटकपूर्व जामिनासाठी धडपड करीत होते. ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. पाेलीस त्यांच्या अटकेच्या प्रयत्नात हाेते. राजकीय दबावामुळे त्यांची अटक टळेल, असे बाेलले जात हाेते. मात्र अखेर शनिवारी त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय गाजल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणी आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत १९ लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काहींना अटक झाली आहे, तर काहीजण अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील आहेत.
पूर्वीच तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार हे अटकेत आहे़ आता त्यात काही सेवानिवृत्त व विद्यमान शिक्षणाधिकारी टार्गेटवर येण्याची शक्यता आहे़ सायबरला नवे डीसीपी आल्याने त्यांनी वेगाने तपासाला प्रारंभ केला आहे. आठ शिक्षणाधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत.
त्या दोन पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाईराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील दलालांची नावे यापूर्वीच नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिली आहेत. याशिवाय, देशमुख यांनी शिक्षणमंत्री यांच्याही मतदारसंघात बोगस भरती झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन माजी सदस्यांनी आपल्या पत्नींना अशाच पद्धतीने साहाय्यक शिक्षक म्हणून लावले आहे. त्यांची नावे सायबर व एसआयटीच्या रडारवर आहेत.