नागपूर : राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू सोबतच स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २५ दिवसांत स्वाईन फ्लूच्या १८ रुग्णांची नोंद झाली असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल ) दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार शहरात बुधवारी आणखी दोन नवे रुग्ण आढळून आले तर एका ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत रुग्णांची संख्या सात तर मृत्यूची संख्या पाचवर गेली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान नागपूर विभागात ६३४ रुग्णांची नोंद झाली असून १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या नऊ महिन्यात सर्वाधिक ३३३ रुग्ण शहरात आढळून आले आहे, त्या खालोखाल वर्धेत ४२ रुग्णांची नोंद झाली आहे. मेडिकलमध्ये दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
स्वाईन फ्लू वाढतोय मृत्यूची संख्या पाच : २५ दिवसांत १८ रुग्णांची नोंद
By admin | Updated: September 25, 2015 03:39 IST