सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना आवश्यक सोयींचा तुटवडा पडत चालला आहे. सध्याच्या स्थितीत रुग्णालयात बेड नाहीत, रेमडेसिवीवर इंजेक्शन नाहीत आता यात आरटीपीसीआर चाचणीसाठी लागणाऱ्या किटचा म्हणजे ‘व्हीटीएम’चा तुटवडा पडला आहे. शुक्रवारी मोजक्याच खासगी लॅबमध्ये किट उपलब्ध होत्या. दुपारनंतर त्या किटही संपल्याने अनेकांवर विना चाचणी परतण्याची वेळ आली.
नागपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढताच कोरोना चाचण्यांची संख्याही वाढली. मार्च महिन्याच्या सुरूवातील १० ते १२ हजाराच्या घरात होणाऱ्या चाचण्या शेवटच्या आठवड्यात १६ हजारांवर गेल्या. मागील तीन दिवसांपासून रोज १९ हजारांवर चाचण्या होत होत्या. शुक्रवारी वाढून २२ हजारांवर गेल्या. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही ५ हजारांवरून ६ हजारांवर गेली. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या गरजेच्या ठरत आहे. परंतु ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यासाठी ज्या ट्यूबमध्ये संशयित रुग्णाचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जाते त्या ‘व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम (व्हीटीएम) किटचा तुटवडा पडला. अचानक चाचण्या वाढल्याने व मागणीच्या तुलनेत कमी किट उपलब्ध झाल्याने गुरुवारपासून अनेक खासगी लॅब अडचणीत आल्या. शुक्रवारी तर अनेक लॅबमध्ये ठणठणाट होता.
-मनपाच्या चाचणी केंद्रावर उसळली गर्दी
अनेक खासगी लॅबमध्ये किट नसल्याने चाचणीसाठी आलेल्यांनी मनपाच्या चाचणी केंद्रावर गर्दी केली. परंतु येथे सकाळी ९ वाजता नाव नोंदणी व ११ वाजेनंतर ‘स्वॅब’ घेतले जात असल्याचा अजब प्रकार होत असल्याने व त्यातही ५० किंवा जास्तीत जास्त १०० चाचण्यांची मर्यादा असल्याने अनेकांवर विना चाचणी परतण्याची वेळ आली.
-सोमवारी किट येण्याची शक्यता
सध्याच्या स्थितीत नागपुरात सुमारे १५ वर खासगी लॅबमधून कोरोनाची चाचणी केली जाते. मागील दोन आठवड्यात रुग्णसंख्या वाढताच प्रत्येकाकडे चाचण्यांची संख्याही वाढली. यामुळे ‘व्हीटीएम’ची मागणी वाढल्याने तुटवडा पडला. नागपुरातील पुरवठादाराने कंपनीकडे मागणी केली आहे. परंतु शनिवार व रविवार लॉकडाऊन असल्याने सोमवारीच किट उपलब्ध होण्याची शक्यता आहे.