आईचा टाहो : वेदांतच्या आत्महत्येची हळहळ आणि आश्चर्यहीनागपूर : तू शाळेत नाही गेला नाही तर माझे सर्व प्रेम फक्त तुझ्या बहिणीला मिळेल. शिक्षणाची गोडी नसल्यामुळे आईने व्यक्त केलेल्या या भावना, वेदांतच्या मनाला बोचून गेल्या. अवघ्या ११ वर्षांच्या वयात स्वत:ला संपवून, आपल्या आईसह संपूर्ण कुटुंबाला तो दु:खात बुडवून गेला. वेदांतचे हे जाणे समाजमनाला चटका लावून गेले. परंतु त्याच्या आईचे हे बोल, आईलाच खिन्न करून गेले. आता तो निघून गेला, कशाला हवी प्रसिद्धी अशी भावना व्यक्त करीत, वेदांतच्या आईचा टाहो मन हेलावून गेला.जयताळा परिसरातील महाजन लेआऊट येथे राहणारे संजय आणि वैशाली राऊत यांचा वेदांत हा एकुलता एक मुलगा. खूप खेळकर, दिवसभर खेळण्यात दंग असलेल्या वेदांतला शाळेची फारशी गोडी नव्हती. त्यामुळे तो अनेकदा शाळेत जात नव्हता; शिवाय काही दिवसांपासून त्याला पोटात दुखण्याचा त्रासही होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला डॉक्टरकडेही नेले, मात्र खूप काही गंभीर नव्हते. १५ नोव्हेंबरला वेदांतची शाळेत प्रकृती अस्वस्थ झाली. शिक्षकांनी त्याच्या आईला बोलावून त्याची समजही काढली. आईने त्याला तुझी शाळा शिकण्याची इच्छा नाही का? अशी विचारणा केली. तेव्हा त्याने शिकण्यास नकार दिला. आई त्याला काहीही न बोलता घरी घेऊन आली. फक्त ‘तू शाळेत नाही गेला नाही तर माझे सर्व प्रेम फक्त तुझ्या बहिणीला मिळेल.’ एवढेच बोलून ती चूप बसली. १६ नोव्हेंबरला सकाळी शाळेची गाडी त्याला घ्यायला आली. आईने त्याला शाळेत जायला उठविले नाही. दुपारी वेदांतने छान जेवण केले. घरापुढे फटाकेही फोडले. वेदांत खेळत असल्याचे बघून आई कामानिमित्त बाहेर गेली. हीच संधी बघून त्याने घराचे दार आतून बंद करून गळफास लावला. शिक्षणात गोडी नसल्यामुळे अथवा शैक्षणिक ताणतणावातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची अनेक प्रकरणे समोर येतात. मात्र, अवघ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने असे पाऊल उचलणे धक्कादायक आहे. समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. (प्रतिनिधी)
आता तो निघून गेला...
By admin | Updated: November 18, 2016 03:03 IST