नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रांत आणि भाषावाद निर्माण करून अमराठी भाषिकांमध्ये दहशत निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत स्पष्टीकरण सादर करण्यास निवडणूक आयोगाने उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाकरे यांना आयोगाने १३ आॅक्टोबर रोजी नोटीस जारी करून १५ आॅक्टोबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु ठाकरे यांच्यावतीने तीन दिवसांची मुदत मागण्यात आली. आयोगाने ती उद्या १८ आॅक्टोबरपर्यंत मंजूर केली. दरम्यान भाजपच्या विधी व कायदा आघाडीचे राष्ट्रीय सहसंयोजक आणि अखंड भारत अभियानचे अध्यक्ष अॅड. विनोद तिवारी यांनी आज पत्रपरिषद आयोजित करून मनसेच्या उमेदवारांचा मताधिकार सहा वर्षांसाठी गोठवण्यात यावा आणि मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. राज ठाकरे यांनी आदर्श आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केले आहे, अशा आशयाची तक्रार खुद्द अॅड. तिवारी यांनी ८ आॅक्टोबर रोजी केली होती. ही तक्रार १० आॅक्टोबर रोजी मुंबई येथील भाजपचे श्रीकांत भारतीय यांनी मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविली होती. या अधिकाऱ्याने ही तक्रार स्वत:च्या अहवालासह १२ आॅक्टोबर रोजी मुख्य निर्वाचन आयोगाकडे पाठविली होती. अहवालात राज ठाकरे यांनी ५ आणि ७ आॅक्टोबर रोजी घाटकोपर व कलिना येथे केलेले भाषणाचे काही अंश नमूद करण्यात आले होते. ‘तुम्ही हे राज्य माझ्या हाती सोपविल्याच्या तारखेपासून कोणत्याही उद्योगात केवळ मराठी मुला मुलींनाच रोजगार दिल्या जाईल. परप्रांतीयांना कोणताही रोजगार दिला जाणार नाही. त्यांचा महाराष्ट्रातील शिरकाव थांबवला जाईल. राज्याच्या सीमेवर ‘नो एन्ट्री’ ची फलक उभारले जातील’, असा उल्लेख भाषणात होता. ठाकरे यांनी प्रांतवाद आणि भाषावादाच्या मुद्यावर मराठी भाषिकांना मते मागून भारतीय राज्य घटनेतील राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सार्वभौम संघीय व्यवस्थेला तडा दिला आहे. अमाराठी भाषिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. भ्रष्ट निवडणूक मार्गाचा अवलंब केला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. व्ही. एस. संपत यांनी कारवाई प्रारंभ केली असल्याचे अॅड. तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेत शकीब खान, अपूर्वा तिवारी, नितीन राऊत (पाटील) उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज ठाकरे यांना नोटीस
By admin | Updated: October 18, 2014 02:57 IST