विजय रुपानी : संघ स्मृतिमंदिरास भेट, हेडगेवार-गोळवलकरांच्या समाधीचे दर्शननागपूर : ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे गुजरातमधील व्यापारी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. हा निर्णय देशहितासाठी घेण्यात आला असून सामान्यांचादेखील याला पाठिंबा आहे. याचा गुजरातच्या निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नाही व आगामी निवडणुकांत भाजपच परत सत्तेवर येईल, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरची त्यांची ही पहिलीच नागपूर भेट होती. यावेळी त्यांनी आवर्जून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.शनिवारी ते नागपुरात आले असता दुपारच्या सुमारास त्यांनी स्मृतिमंदिर परिसरात संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गुजरातमध्ये पटेल समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन केले होते. मात्र आता या आंदोलनाचे अस्तित्वच राहिले नसून ते निस्तेज झाले आहे. राज्यात ‘आप’चा प्रभावदेखील नाही. शिवाय पोटनिवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपचेच सरकार सत्तेत येईल, असे ते म्हणाले. नागपुरात संघस्थानावर येणे हा सुखदायक अनुभव असतो. याअगोदरदेखील संघ मुख्यालयात मी आलो आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे, हेडगेवार स्मारक समितीचे सचिव अजय जगदळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
‘नोट’बंदीचा निवडणुकांवर परिणाम नाही
By admin | Updated: November 13, 2016 02:50 IST