लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात सर्वच वाईट सुरू आहे असे अनेकांना वाटते, कारण त्यांची चांगले बघण्याची दृष्टी कमकुवत असते. आजही समाजात ४० टक्के सत्कार्य आहे. पण हल्ली देशात नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रसारित व प्रकाशित होतात. पण वस्तुस्थिती फार वेगळी असते. निवडणुकीतील ‘नोटा’ म्हणजे समाजातील निराशेच्या सुरांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमवारी सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, सचिव ज्योत्स्ना पंडित, माजी महापौर कुंदा विजयकर, डॉ. प्रवीण गादेवार, छाया गाढे, देवेंद्र दस्तुरे, राजू मोरोणे, सुधीर कुणावार उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते पद्मश्री राणी बंग यांना लोकमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर लोकमाता स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार ‘सक्षम’ या संस्थेस प्रदान करण्यात आला. लोकमाता विशेष सेवा पुरस्काराने चंद्रपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व लेखक अनंत ढोले यांना पुरस्कृत करण्यात आले.यावेळी सरसंघचालक म्हणाले की, परदेशात धनाढ्य व राजपुरुषांची चरित्रे साकारली जातात. तर भारतात पित्याच्या आज्ञेने १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र वर्षानुवर्षे अनुसरले जाते. असे असले तरी समाजात बरेचदा निराशेचे सूर उमटताना दिसतात. निवडणुकीतील ‘नोटा’ हे त्याचेच प्रतीक आहे. परंतु, याचा अर्थ समाजात काहीच चांगले घडत नाही असे नव्हे. संघकायार्साठी आपला देशभर प्रवास होतो. त्यातून बºयाच गोष्टींचा बोध होतो. समाजात जेवढी नकारात्मकता प्रसारित किंवा प्रकाशित होते त्याहून ४० टक्के अधिक चांगल्या गोष्टी घडतातहेत. समाज, देश आणि जग यात सत्तेमुळे नव्हे तर लोकशक्तीने परिवर्तन होत असते. त्यासाठी प्रत्येकामध्ये कर्तव्यबुद्धीसोबतच जिव्हाळा असणे आवश्यक आहे. माणसाने एकांतात आत्मसाधना आणि लोकांतात परोपकार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. आभार डॉ. प्रवीण गादेवार यांनी मानले.