नागपूर : शहरातील १६० मैदाने व उद्यानांमध्ये ग्रीन जिमच्या निर्मितीसाठी जिल्हा विकास योजनेत ११.१२ कोटी रुपयांची निधीची तरतूद हाेऊनही ग्रीन जिमची निर्मिती झाली नाही. काेराेना काळात नागरिकांचे आराेग्य सुदृढ राखणे महत्त्वाचे असताना महापालिका निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी हे महत्त्वाचे काम लांबविले जात असल्याचा आराेप नागपूर सिटिझन फाेरमने केला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती नुकतीच पुढे आली. लाेकमतने नुकतेच याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकल्यानंतर नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात नागपूर सिटिझन्स फोरमने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कोरोनाच्या प्रकोपामुळे निविदा प्रक्रियेला उशीर झाल्याचे क्रीडा विभागातर्फे सांगण्यात येते. यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन निवडणुकांची वाट न पाहता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत शहरातील १६० नियोजित जागांवर ग्रीन जिमच्या निर्मितीचे काम सुरु करावे अशी मागणी फोरमतर्फे करण्यात आली आहे. यावेळी फोरमचे प्रतिक बैरागी, अभिजीत झा, अभिजीत सिंह चंदेल, अमित बांदूरकर, गजेंद्र सिंग लोहिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. ग्रीन जिमच्या साहित्याचा दर्जा योग्य आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी, देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदारावर सोपवावी, ग्रीन जिमच्या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराचे नाव व मोबाईल नंबर असणारे फलक ठळक अक्षरात लावणे बंधनकारक असावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी याकडे व्यक्तिगत लक्ष घालावे व नागरिकांना ग्रीन जिम उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी फोरमचे सदस्य प्रतीक बैरागी यांनी केली आहे. मनपाने शहरातील ग्रीन जिमचे ऑडिट करावे, अशी मागणी अभिजीत सिंह चंदेल यांनी केली.