बुटीबोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अत्यावशक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लावले आहे. मात्र बुटीबोरी येथे शासकीय नियमांचे उल्लंघन करून सलून चालविणाऱ्या चालकाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या न. प. कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे. गुरुवारी (दि.२०) रोजी प्रभाग क्रमांक ७ येथील ब्युटी व्हाइस इंटरनॅशनल सलून येथे ही घटना घडली.
शासनाच्या ब्रेक द चेन या अभियानाअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली राहतील. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत नसलेले व सकाळी ११ नंतर खुल्या राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश बुटीबोरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कारवाई मोहीम सुरू असताना एमआयडीसीरोडवर असलेले ब्युटी व्हाइस सलून सुरू असल्याची माहिती नगर परिषद कर्मचाऱ्यांना मिळाली. या सलून दुकानावर कारवाई करण्यासाठी कर्मचारी गेले असता दुकान मागच्या दारातून सुरू होते. कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता तीन लहान मुले, चार किन्नर व इतर ग्राहक दिसून आले. सलून दुकान अत्यावश्यक सेवेत मोडत नसल्याने कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना बाहेर काढून दुकानाला सील केले. दुकानाला सील का केले म्हणून सलून व्यावसायिकाने नगर परिषद कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बुटीबोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सलून व्यावसायिक अकील सय्यद व दीपक करवाडे यांच्यावर भांदवि कलम १८६,१८८,१८७,५००,५०१,५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे.