नागपूर : वर्ल्ड क्लासच्या यादीत समावेश असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकावर पार्किंगची व्यवस्थाच नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांनी इतरत्र आपली दुचाकी उभी केल्यास वाहतूक पोलीस दंड आकारत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी नातेवाईक दुचाकीने येतात. परंतु रेल्वेस्थानकावर आरपीएफ ठाण्याच्या समोर दुचाकीची पार्किंग आहे. ही पार्किंग केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे नागरिकांना आपली दुचाकी उभी करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. रामझुल्याच्या खाली असलेल्या पार्किंगचे कंत्राट रेल्वेने दिलेले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नातेवाइकांना सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आलेले नागरिक जागा मिळेल तेथे दुचाकी उभी करतात. नो पार्किंगमध्ये दुचाकी उभी केलेली असल्यामुळे वाहतूक पोलीस नागरिकांना दंड आकारतात. त्यामुळे नागरिकांची गोची होत आहे. पार्किंगचे पैसे देण्यास तयार असूनही पार्किंगची व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
..............