सीईओ अमिताभ कांत यांची गिट्टीखदानला भेट : नागरिकांशी साधला संवाद नागपूर : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अमिताभ कांत यांनी रविवारी गिट्टीखदान परिसरातील दशरथनगरला भेट दिली. तसेच जलसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. आयुक्त श्रावण हार्डीकर, नीती आयोगाचे सल्लागार आलोककुमार, ओसीडब्ल्यूचे प्रवर्तक अरुण लखानी यावेळी उपस्थित होते. दशरथनगर हा २५० ते ३०० घरांचा परिसर आहे. दोन वर्षांपूर्वी ३०-३५ घरांमागे एक सार्वजनिक नळ अशी येथील परिस्थिती होती. पाणीटंचाईमुळे लोकांची भांडणे व्हायची. तसेच दूषित पाण्याची समस्याही गंभीर होती. यामुळे नागरिक त्रस्त होते. परंतु २०१४ साली २४ बाय ७ योजनच्या माध्यमातून या भागात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. नळजोडण्या बदलण्यात आल्या. सन २०१५ मधे परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. नागरिकांना २४ तास पाणी मिळू लागले. यामुळे येथील नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला. अमिताभ कांत यांच्यासमोर नागरिकांनी बदललेल्या परिस्थितीची माहिती दिली. पाण्याची समस्या सुटल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका ओसीडब्ल्यूच्या सहकार्याने झोपडपट्टी विकास प्रकल्प राबवित आहे. या वस्त्यात आरोग्यविषयक, शिक्षणासंबंधी, महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेसंबंधी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. अमिताभ कांत यांनी या दोन्ही योजनेपासून प्रभावित झाल्याचे टिष्ट्वट केले. दोन स्वतंत्र टिष्ट्वटमधून त्यांनी दोन्ही प्रकल्पाची प्रशंसा केली. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधल्याने योजनेची व्यापकता वाढविण्यास मदत होईल, असा विश्वास श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केला. नीती आयोगाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी नागपूरच्या वस्त्यांमध्ये रणरणत्या उन्हात येणे यातून दिसून येणारी संवेदनशीलता आणि समावेशकता प्रशसंनीय असल्याचे मत अरुण लखानी यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)
नीती आयोगाने समजून घेतली २४ बाय ७
By admin | Updated: April 17, 2017 02:49 IST