लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : आगारातून भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर मार्गाकडे जाणाऱ्या एसटी बसेसचा प्रवास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौक येथूनच पुढे असावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने सोपविण्यात आले. उमरेड आगाराचे व्यवस्थापक संजय डफरे यांच्याकडे निवेदन सोपवित या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले.
भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर मार्गाकडे जाणाऱ्या एसटी बसेस उमरेड आगारातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्गाने भिवापूर नाका चौक परिसरातून जातात. अशा वेळी शहरातील भारतीय स्टेट बँक परिसर, बायपास चौक, रेल्वे क्रॉसिंग आदी ठिकाणी एसटीची प्रतीक्षा असंख्य प्रवासी करीत असतात. एसटी या मार्गाने येत नसल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सला हात दाखवितात. यामुळे प्रवाशांना हकनाक त्रास सोसावा लागत असून, एसटी महामंडळालासुद्धा चांगलाच फटका बसत असल्याची बाब यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षक परिषदेच्या जिलाध्यक्ष मनीषा कोलारकर, कार्याध्यक्ष विजय नगरनाईक, सहसचिव सोपान घुले, वृंदा कथले, घनश्याम लांजेवार, बाबा मेश्राम आदींची यावेळी उपस्थिती होती.