राजेश शेगोकारनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परवा निकाल लागला अन् विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी यूपीएससीचे आकाश उजळवून टाकले. यामधील एक- दोघे सोडले, तर सर्व गुणवंत हे सर्वसामान्य घरातील. गडचिरोलीच्या अल्पशिक्षित शेतमजुराचा मुलगा शुभम तलावी, अमरावतीच्या शेतकऱ्याची मुलगी नम्रता ठाकरे, इलेक्ट्रिशियनची कन्या भाग्यश्री नयकाळे, मेळघाटातील ऑटोचालकाचा मुलगा शिवांग तिवारी, वयाच्या २८ व्या वर्षी यशस्वी ठरलेला रजत पत्रे, यवतमाळची अदिबा अनम अश्फाक अहमद, इतकेच नव्हे, तर नैराश्य न येऊ देता पाचव्या प्रयत्नात यश गाठणारा गोंदियाचा सचिन बिसेन असो, की चौथ्या प्रयत्नात गुणवंत ठरलेली सावी बालकुंडे असो, त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि अपयशावर मात करीत मिळवलेले हे यश पुढच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
कोणत्याही कोचिंग क्लासची चकाकी नाही, शहरातील स्पर्धात्मक वातावरण नाही, तरीही या ग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामान्य कुटुंबांतील गरिबी, साधेपणा आणि संघर्ष यांच्या सावलीत वाढलेली एक पिढी आता देशाच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही केवळ यशाची कहाणी नाही, तर एका संधीचीही आहे. हातावर पोट घेऊन धडपडणाऱ्या घरात, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवणाऱ्या या मुलांना कुटुंबाने संधी दिली अन् या मुलांनी तिचे सोने केले. त्यामुळेच यशामागे संपूर्ण कुटुंबाचा एक प्रवास आहे.
यामधील अनेक मुलांनी तिसऱ्या ते पाचव्या प्रयत्नात यश गाठले आहे. पहिल्या वा दुसऱ्या प्रयत्नात अपयश आल्यावर नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी या गुणवंतांचे यश हे दीपस्तंभ ठरले आहे. जिद्द व ध्येयाप्रति असलेली निष्ठा प्रखर असेल, तर कुठल्याही नैराश्यावर मात करता येते, हा मोठा धडा या यशामधून स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. शिवाय कोणत्याही पालकांनी 'पॅरेन्टिंग कोर्स' न करता केवळ ममत्वाने, समजूतदारपणाने आणि खंबीरतेने आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे राहणे ही बाब या भरारीचा पाया ठरली, याचीही नोंद इतर पालकांनी घेणे गरजेचे आहे.
कधीकाळी प्रशासकीय सेवा म्हणजे फक्त मोठ्या घरातल्या मुलांची मक्तेदारी, असा दृढ समज होता; पण आता या नव्या पिढीने तो समज चुकीचा ठरवला आहे. प्रशासकीय सेवा आता या पिढीच्या वयोगटाच्या कवेत आली असून, डोळ्यांत नवी स्वप्ने पाहणारी ठरली आहे. या विद्यार्थ्यांची कहाणी ही केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर ती आहे दुसऱ्या पिढीला उमगणाऱ्या शक्यतांची. त्यांनी सिद्ध केले आहे की, परिस्थिती काहीही असो, जर मनात निर्धार असेल, तर कोणतीही उंची गाठता येते. त्यामुळेच ही गुणवंत मुले केवळ त्यांच्या आई- वडिलांची शान नाहीत, तर ती बनली आहेत सामान्यांच्या स्वप्नांचे नवे हीरो.
मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळागावाच्या मातीमध्ये खेळणारी, अंगणात अभ्यास करणारी; मात्र मोठी स्वप्ने पाहणारी ही मुले आता देशाच्या प्रशासकीय सेवेतील मजबूत खांब बनली आहेत. यामधील २० टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, ती जिल्हा परिषदेच्या एका साध्या, मातीच्या गंधाने भरलेल्या वर्गखोलीतून. या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले. इंग्रजी न येणे ही अडचण नव्हती, उलट आपल्या भाषेतून शिकताना त्यांनी विषय समजून घेतले, विचार स्वच्छ केले आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले व यशस्वी झाले. कोणतीही सुविधायुक्त शाळा नसतानाही, त्यांची मेहनत, चिकाटी आणि आई- वडिलांची साथ यांनी मिळून हा विजयाचा पाया रचला.