नागपूर : घराबाहेर खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला आपल्या घरात नेऊन ४५ वर्षीय शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नऊ वर्षांची मुलगी गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास घराबाहेर खेळत होती. बऱ्याच वेळापासून तिचा आवाज ऐकू येत नसल्याने आईने मुलीला घरात येण्यासाठी आवाज दिले. तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आईने घराबाहेर येऊन बघितले असता बाजूला राहणाऱ्या आरोपी दशरथ वामन मेश्राम याच्या घरातून ही मुलगी घाबरलेल्या अवस्थेत धावत बाहेर आली. तिच्या मागेच आरोपीही आला. मुलीची अवस्था पाहून त्यानंतर पीडित मुलीने आरोपी मेश्रामने तिच्यासोबत कुकृत्य केल्याचे आईला सांगितले. घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच संतापाचे वातावरण निर्माण झाले. ते लक्षात घेऊन आरोपी वस्तीतून पळून गेला. पीडित मुलीच्या आईने तिला घेऊन नंदनवन पोलीस ठाणे गाठले. तिथे आरोपी दशरथ मेश्रामविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---