देवेंद्र फडणवीस : कर्करोग इस्पितळाचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. जागृती आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्करोगाच्या नियंत्रणासाठी त्या दिशेने मौलिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कामठी मार्ग येथील ‘एचसीजी-एनसीएचआरआय’च्या (हेल्थ केअर ग्लोबल-नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट)अत्याधुनिक कर्करोग इस्पितळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, ‘एचसीजी एनसीएचआरआय’चे अध्यक्ष डॉ. बी. एस. अजयकुमार, डॉ. अजय मेहता, डॉ. सुचित्रा मेहता, डॉ. दिनेश माधवन् इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रदूषण आणि तंबाखू सेवनामुळे कर्करोग रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपुरात नव्याने उभारलेल्या रुग्णालयामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील. रुग्णालयातील अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे अचूक निदानासोबतच योग्य उपचार होणे शक्य होणार आहे. या रुग्णालयामुळे नागपूर आणि प्रामुख्याने मध्य भारतात कर्करोगावर संशोधन आणि उपचार उपलब्ध झाल्यामुळे कॅन्सर पीडितांना इतर ठिकाणी उपचाराला जाण्याची गरज राहिलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांचे व कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी समाजानेदेखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय ‘कॅन्सर सर्व्हायव्हल डे’च्या निमित्ताने कर्करोगाशी लढा देणारे मनीष बत्रा, अर्चना दास, गीता माथूर, डॉ. निर्मला वझे, डॉ. सुनंदा सोनालीकर, सुलक्षण सचदेव, आशिष गजभिये यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले तर डॉ. सुचित्रा मेहता यांनी आभार मानले.इतर जिल्ह्यातही कर्करोग इस्पितळकर्करोगामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरील उपचार महागडे आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागपूरच्याच धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातही कर्करोग इस्पितळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
कर्करोग नियंत्रणासाठी संशोधन होणे आवश्यक
By admin | Updated: June 5, 2017 02:03 IST