नागपूर : समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज असून यादृष्टीने साहित्यिकांनी लिखाण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महिला क्लबच्या अध्यक्षा विलासिनी नायर यांनी येथे केले. ‘अभिव्यक्ती’ वैदर्भीय लेखिका संस्थेचा ३८ वा वर्धापन दिन शनिवारी विनोबा विचार केंद्र सर्वोदय आश्रम सभागृह धरमपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. नेत्रतज्त्र डॉ. कविता सातव, डॉ लीना रस्तोगी प्रमुख अतिथी होत्या. विलासिनी नायर म्हणाल्या, जगातील प्रत्येक देशाकडून कुठली ना कुठली गोष्ट शिकता येईल. काही देशांकडून उत्तम तंत्रज्ञान शिकता येईल तर काही देशांकडून वेळेचे काटेकोर पालन करणे शिकण्यासारखे आहे. परंतु यासर्वांपेक्षा आपला देश हा मानवता शिकवितो. तेव्हा आपल्या देशातच अनेक चांगल्या गोष्टी असून त्या पुढे आणण्याचे आवाहन त्यांनी केले. बाळ कुळकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, माणूस तोपर्यंतच जिवंत असतो जोपर्यंत त्याच्यात संवेदनशीलता असते. कारण संवेदना संपली की माणसाचे जगणे काहीच कामाचे नाही. भाषा ही महत्त्वाची नसून भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्य हे कोणत्या भाषेतील आहे, यापेक्षा ते शेवटच्या माणसाला काय देत हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना चांगली मार्केटिंग करता येते ती क्षुल्लक माणसेही मोठी झाली आहेत. परंतु ज्यांची उंची खरच खूप मोठी आहे, ती माणसे मात्र मागे पडत आहेत हे समाजाचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शुभा साठे यांनी संचालन केले. हेमा नागपूरकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. नंदिनी खडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज
By admin | Updated: March 29, 2015 02:27 IST