नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाचा घटक असलेली राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग नेमका किती सदस्यांचा असावा, यावरून गोंधळलेली आहे. राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीची घोषणा करताच शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी स्वागत करीत याचा राष्ट्रवादीला फायदाच होईल, अशी भूमिका मांडली होती. मात्र, चार दिवसानी शनिवारी त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करीत एक-किंवा दोन सदस्यीय प्रभाग करण्याचा ठराव मंजूर करण्याचा ठराव घेण्यात आला.
चार सदस्यीय प्रभागात राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला होता. दुनेश्वर पेठे हे एकमेव नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मोठ्या प्रभागात कसा दम लागतो, याचा अंदाज त्यांना आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाला. त्यामुळे पेठे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गोची झाली. पेठे यांनी तर या निर्ण्याचे स्वागत करीत आम्ही ताकदीने लढू व जिंकू, असा दावा केला होता. मात्र, चारच दिवसात राष्ट्रवादीला वास्तविकतेची जाणीव झाली. शनिवारी कार्यकारिणीच्या बैठकीत पेठे यांनी एक किंवा दोन सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडत मंजूर केला. हा प्रस्ताव आता प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे. बहुसदस्यीय प्रभागात नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित होत नाही. नागरिकांचाही याला विरोध आहे. यामुळे असा ठराव घेण्यात आल्याचे पेठे यांनी स्पष्ट केले. बैठकीत माजी मंत्री रमेश बंग, माजी आ. दीनानाथ पडोळे, अल्पसंख्यक सेल अध्यक्ष शब्बीर विद्रोही, प्रदेश पदाधिकारी अनिल अहिरकर, बजरंग परिहार, जानबा मस्के, आभा पांडे, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, दिलीप पनकुले उपस्थित होते.