नागपूर : नागपूर महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा योजना खासगी कंपनीच्या हाती दिल्यापासून महापालिकेला दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नागपूरच्या जनतेला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा दावाही फोल ठरला आहे. शहरात २४ तास तर दूर बहुतांश एरियामध्ये अर्धा ताससुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची स्थिती आहे. महापालिकेने पाण्याची समस्या दूर करावी यासाठी राष्ट्रवादीचे वेदप्रकाश आर्य यांनी महापालिकेपुढे ठिय्या देत उपोषण सुरू केले आहे. वेदप्रकाश आर्य यांचे म्हणणे आहे, महापालिकेकडे जेव्हा पाणीपुरवठा वितरणाची यंत्रणा होती, तेव्हा मनपा तीन कोटी रुपयांनी फायद्यात होती. खासगीकरणानंतर ५६२ कोटी रुपयाचा तोटा झाला आहे. शहरात पुरवठ्याचे काम बघणाऱ्या ओसीडब्ल्यूचा ठेका रद्द करावा, एनईएसएलची चौकशी व्हावी, दरवर्षी ५ टक्के दरवाढ बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, दिलीप पनकुले, दिलीप जैस्वाल, जावेद हबीब, जानबा मस्के, लक्ष्मी सावरकर, अशोक काटले, रेखा कुपाले, किरण यादव, विशाल खांडेकर, सुनिता शेंडे, सचिन मोहोड, भय्यालाल ठाकूर, संजय शेवाळे, अजय मेश्राम, प्रशांत पवार, अविनाश गोतमारे, बाबाराव गावंडे आदी सहभागी झाले होते.
पाण्यासाठी राष्ट्रवादी उपोषणावर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST