नागरिकांसह धडकले : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त होईल असे वाटत असताना राज्य सरकारने नासुप्रला दीपक म्हैसेकर यांच्या रूपात पूर्णवेळ सभापती दिले. मात्र, दुसरीकडे भाजपचे आमदारच नासुप्रच्या कारभारावर नाराज आहेत. भाजपचे आमदार व शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे आज पदाधिकारी व नागरिकांसह नासुप्रवर धडकले. नासुप्र निष्क्रिय झाली आहे. काहीच कामे करीत नाही, असा ठपका ठेवत आता येथील अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार करतो, अशी तंबीही त्यांनी दिली. आ. सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्त्वात उपमहापौर सतीश होले, नगरसेवक रमेश सिंगारे, स्वाती आखतकर, दिव्या धुरडे, विलास करांगळे, किशोर पेठे यांच्यासह दक्षिण नागपुरातील नागरिक नासुप्रवर धडकले. शिष्टमंडळाने सभापती दीपक म्हैसेकर, मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांच्याशी चर्चा करून कामकाजावर नापंसती व्यक्त केली. कोहळे म्हणाले, दक्षिण नागपूरच्या उद्यानातील खेळणी तुटलेली आहेत. दोन वर्षांपासून ती बदललेली नाहीत. निविदा चार वेळा काढूनही मार्ग निघत नाही. ग्रीन जीमचे काम अद्याप मंजूर झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० कोटी रुपयांची कामे करण्याचे निर्देश दिले असताना प्रत्यक्षात फक्त १० कोटींची कामे झालेली आहेत. दुर्गानगरमध्ये सीएम फार्म्युल्यांतर्गत शासनाकडे सूट मागायची होती. जानेवारी महिन्यात विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली. मात्र, त्यानंतरही आजवर शासनाकडे ती फाईल मंजुरीसाठी गेली नाही. टेंडर निश्चित झाल्यावरही कार्यादेश द्यायला तीन आठवडे लागत आहेत. नासुप्रमुळे शहराचा विकास खोळंबला आहे, असा आरोप करीत या सर्व कारभाराची आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करू, असा इशाराही कोहळे यांनी दिला. शिष्टमंडळाच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर सभापती म्हैसेकर यांनी प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन ते सोडविले जातील, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
नासुप्रवर भाजपचे आमदार नाराज
By admin | Updated: June 10, 2016 02:56 IST