हेल्मेट न वापरणाऱ्यांना निबंध लेखनाची शिक्षा : आतापर्यंत दोन लाख वाहनचालकांवर कारवाईनागपूर : उपराजधानीत आता ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे. गेल्या ११ महिन्यात दोन लाख वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. परंतु दंडात्मक कारवाई करूनही ५० ते ६० टक्केच फरक पडल्याचे शहरातील रस्त्यांवरील चित्र आहे. यामुळे वाहतुकीचा नियम मोडणाऱ्याला याची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून नाशिक पोलिसांचा अभिनव प्रयोग नागपुरातही व्हायला हवा, दोषी वाहनचालकांकडून हेल्मेटचे महत्त्व या विषयावर निबंध लिहून घ्यावे, अशी मागणी होत आहे.दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. उपराजधानीत याची सक्ती ८ फेब्रुवारी २०१६ पासून करण्यात आली. परंतु हेल्मेटविषयी जनजागृती न करता व हेल्मेट विकत घेण्यास मुदत न दिल्याने याला विरोध झाला. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल करीत जनजागृतीचे कार्य हाती घेतले. परंतु नंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. मात्र यात विनाहेल्मेट वाहनचालकांना थांबविल्यानंतर अनेक वेळा वाद व्हायचा. चालान फाडून शुल्क आकारण्यापर्यंत वेळ जायचा. यावर उपाययोजना म्हणून ६ आॅक्टोबर २०१६पासून ‘ई-चालान’ घरपोच पाठविणे सुरू झाले. यामुळे जास्तीतजास्त वाहनांवर कारवाई करणे शक्य झाले. सोबतच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याद्वारेही ‘ई-चालान’ पाठविले जात आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा वेग वाढला असलातरी आजही ४० टक्के वाहनचालक विना हेल्मेट दुचाकी दामटताना दिसत आहे. नाशिक पोलिसांनी यावर उपाय म्हणून अशा दुचाकीस्वारांची ‘शाळा’च भरविणे सुरू केले आहे. यात ‘हेल्मेटचे फायदे’ या विषयावर मुद्देसूद निबंध लेखन लिहिण्याची शिक्षा दिली जात आहे. याच पद्धतीचा अभिनव प्रयोग नागपुरातही सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दंडासोबतच निबंध लेखनाला सुरुवात झाल्यास ‘हेल्मेट कळेलही आणि वळेलही’ असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)एका अपघातात एखाद्याचा जीव जात असेल. मात्र, त्याच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबीयांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते. कुणाला अपघात झाल्यानंतर डोक्याला मार लागून जीव जाऊ नये, यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट घालून वाहन चालवावे, अशी पोलिसांची भूमिका आहे. पोलिसांच्या या भूमिकेत नागरिकांचेच हित आहे. दुचाकीचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वळण लागावे म्हणून पोलिसांकडून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाते. कारवाईसोबतच जनजागरण आणि समुपदेशनाचेही उपक्रम पोलीस राबवीत आहेत. वाहनचालकांनी पोलिसांची भावना समजून घ्यावी.स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर.
नाशिक पॅटर्न नागपुरातही राबवावा
By admin | Updated: January 13, 2017 02:11 IST